English

Marathi

भारतीय शास्त्रीय संगीत हे जगात अनोखे असे आहे. भारतात संगीताची आराधना अति प्राचीन काळापासून होत आहे. ईश्वराची प्रथम सृष्टी म्हणजे आकाश. 'नाद' हा आकाशाचा गुण आहे. चारी वेदांचे सार एकत्र करून या 'गांधर्व' वेदाची उत्पत्ती ब्रह्म देवाने केली असे मानतात. विद्येची अधिष्ठात्री वीणा धारिणी सरस्वती देवी हिला संगीताची जननी मानतात तर कुणी 'शिव' हे संगीताचे निर्माते आहेत असे मानतात. भारतीय शास्त्रीय संगीत हे सर्व समावेशक व विकसनशील आहे. मानवाची अध्यात्मिक ओढ व त्याच्या लौकिक पातळीवरील भावभावना या दोन्ही अभिव्यक्तींना या संगीताने उत्कृष्टपणे वाव दिला आहे. श्रुती व नाद हा या संगीताचा आत्मा असून लय व ताल हे त्याचे देहस्वरूप आहे. भारतीय संगीतातील 'राग' म्हणजे स्वर व वर्णाने विभूषित असा ध्वनीविशेष जो मनाचे रंजन करतो. भारतीय शास्त्रीय संगीतातील 'राग व्यवस्था' म्हणजे मनाला पूर्ण शांती देणारी गोष्ट आहे. संगीताने जीवन आनंददायी होते.